- Home /
- Page
Crops
ढोबळी मिरचीचे ‘कॅप्सिकम ॲनम’ असे शास्त्रीय नाव आहे. तसेच सिमला मिरची किंवा भोपळी मिरची असेही म्हणतात. ही तिखट नसल्याने तिला काहीजण गोडी मिरचीही म्हणतात. भारतात सहज मिळणारी भोपळी मिरची दाट हिरव्या रंगाची असते. गेल्या काही वर्षात हिरव्या प्रकाराखेरीज लाल, पिवळी, शेंदरी, जांभळी आणि तपकिरी रंगाची सिमला मिरची बाजारात मिळू लागली आहे.
* वातावरण : ढोबळी मिरचीच्या लागवडीस हरितगृहामधील तापमान किमान 18 अंश सेल्सिअस व कमाल 35 अंश सेल्सिअस आवश्यक असते. या पिकासाठी योग्य सापेक्ष आर्द्रता 50 ते 75 टक्क्यांपर्यंत असली पाहिजे. हे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते. पर्यायाने हरितगृहामध्ये उत्पादन केलेल्या मिरचीचा दर्जा चांगला राहतो. तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी झाल्यास व धुके पडल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास फळधारणा होत नाही व फळे पोसत नाहीत.
* लागवड : शेतामध्ये ढोबळी मिरचीची लागवड ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांत करावी.जमीन चांगली, कसदार व सुपीक असावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. सामू सहा ते सात असावा. साधारणपणे जमिनीची खोली एक-दीड मीटर असावी. म्हणून मध्यम ते भारी काळ्या जमिनी या पिकास उत्तम मानवतात. तसेच पोयट्याच्या सुपीक जमिनी सुद्धा चालू शकतात.
* ढोबळी मिरचीच्या जाती : हरितगृहामध्ये लाल, पिवळ्या आणि नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरच्यांची लागवड केली जाते. आपले गाव शहराच्या जवळ असल्यास लाल आणि पिवळ्या रंगांच्या ढोबळी मिरचीला अधिक उठाव मिळू शकतो. कारण या मिरच्यांची चव काहीशी गोडसर असल्याने त्यांचा वापर आपल्याकडे भाजी म्हणून होत नाही. पंचतारांकित हॉटेल आणि मोठ्या शहरांमध्ये मात्र रंगीत ढोबळी मिरच्यांची मागणी अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी अधिक दर उपलब्ध होतो. शहरामध्ये काढणीनंतर आपला माल पाठवणे सोयीचे नसल्यास नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरचीचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा. दर्जेदार उत्पादनामुळे या मिरच्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळू शकतो. आपल्या परिसरानुसार आणि बाजारपेठेतील स्वतःच्या अभ्यासानुसार मिरचीची जात निवडावी.
* रोप निवडीचे निकष : रंगीत ढोबळी मिरचीचा पर्याय निवडल्यास लाल व पिवळा या रंगांचे प्रमाण साधारणपणे 65 टक्के लाल आणि 35 टक्के पिवळा असे ठेवावे.
* लागवड पद्धत : रंगीत ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी गादीवाफ्याचा वापर करावा. गादीवाफा 90 बाय 40 बाय 50 सेंमी. आकाराचा असावा. या वाफ्यावर दोन ओळींत झिगझॅग पद्धतीने लागवड करावी. लागवडीचे अंतर : दोन रोपांतील अंतर – 45 सेंमी. दोन ओळींतील अंतर 50 सेंमी. रोपांची घनता 2.5 रोपे प्रति चौ.मी. मशागतीच्या पद्धती : रंगीत ढोबळी मिरचीचे पीक हे दहा महिन्यांचे आहे. या कालावधीमध्ये विविध मशागतीच्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातील महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेऊ. झाडाला आधार देणे : मिरची पिकाची उंची दहा फुटांपर्यंत जाते. हे पीक आपले आणि फळांचे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे झाडाला आधार देणे गरजेचे असते. एका गादीवाफ्यावर साधारणपणे तीन मीटर उंचीवर तीन गॅल्व्हनाइज्ड आयर्नच्या तारा (12 गेज जाडीच्या) वाफ्याला समांतरपणे बांधून घ्याव्यात. तारा बांधल्यानंतर लागवड करावी. लागवड झाल्यानंतर लवकरात लवकर एका झाडासाठी चार या संख्येत प्लॅस्टिक दोऱ्या तारेला बांधून खाली सोडाव्यात. नंतर त्या झाडाला बांधाव्यात. रोपांचा शेंडा खुडणे : लागवडीनंतर 21 दिवसांनी रोपाचा शेंडा खुडावा. खुडण्यासाठी धारदार कात्रीचा वापर करावा. रोपावर चार-पाच पाने ठेवून शेंडा खुडला जातो, त्यामुळे मिरचीला तीन ते चार फुटवे फुटतात, त्यांना आधारासाठी सोडलेल्या दोऱ्या बांधून घ्याव्यात.
* काढणी : मिरचीची काढणी प्रामुख्याने जाती व रंगानुसार वेगवेगळ्या वेळी सुरू होते. हा कालावधी 90 ते 100 दिवस असा असतो. काढणी करताना दूरच्या बाजारपेठेत पाठविताना मिरचीला पाच टक्के रंग आल्यानंतर काढणी करावी, तर जवळच्या बाजारपेठेसाठी रंग येण्याचे प्रमाण थोडे अधिक असले तरी चालू शकते.
* उत्पादन : मिरचीचे उत्पादन जातीपरत्वे वेगवेगळे दिसून येते. जुन्या किंवा पारंपरिक जातीमध्ये आठ किग्रॅ. प्रति चौ. मी. आणि आयात केलेल्या काही जातींपासून 14-18 किग्रॅ. प्रति चौ. मी. उत्पादन मिळते. प्रतवारी : मिरचीच्या काढणीनंतर फळांचा आकार व वजनानुसार प्रतवारी करावी. साधारणत ः अ दर्जा – 200 ते 250 ग्रॅम, ब दर्जा – 150 ते 199 ग्रॅम, क दर्जा – 150 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या मिरच्या अशा तीन प्रतींनुसार वर्गीकरण केले जाते.