संगमनेर येथे राज्यस्तरीय कृषी उद्योग मंथन-2021 कार्यशाळा उत्साहात
भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि यामध्ये भविष्यात शेतकरीच देशाला तारणारा घटक असणार आहे. त्या आधाराने सध्या ग्रामीण भागांमध्ये जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यात युवकांनी शेतीपूरक व्यवसाय उभारणी करून ग्रामीण भागात रोजगार निर्माण करावा आणि त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या हा एक महत्त्वाचा पर्याय भविष्यात असणार आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले.
शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती व ग्रामीण भागात कृषी उद्योजकता निर्मिती व्हावी, शेतमाल विक्री व्यवस्था सक्षम व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र एफ. पी. ओ. स्टार्ट अप फेडरेशन, धरती शेतकरी प्रोड्यूसर कंपनी लि. व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 1 दिवसीय कृषी उद्योग मंथन-2021 शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी उद्योजकता निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा गुरुवारी (ता.19) सकाळी 9 ते 5 या वेळेत कृष्णा गार्डन (संगमनेर) येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून इंद्रजीत थोरात तर थोरात कारखान्याचे अध्यक्ष प्रताप (बाबासाहेब) ओहोळ, राजहंस दूधचे संचालक विलास कवडे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ, चंदनापुरीचे माजी सरपंच विजय रहाणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, अण्णासाहेब थोरात, भूषण निकम, बाळासाहेब जोंधळे आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये प्रथम सत्रात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, व्यवस्थापन व शासकीय योजना या विषयावर महाराष्ट्र एफ. पी. ओ. स्टार्ट अप फेडरेशनचे अध्यक्ष भूषण निकम यांनी मार्गदर्शन केले. तर शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी मल्टी निधी योजना या विषयावर कृषीतज्ज्ञ विनायक भुसारे, कृषी उद्योजक व एफ. पी. ओ. शेतमाल विक्री कौशल्य यासाठी अमित मखरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या दुसर्या सत्रात कृषी यांत्रिकीकरण व अवजारे बँक संधी यासाठी डॉ. तुळशीदास बास्टेवाड, दुग्ध व्यवसायातील शेतकरी व उत्पादक कंपन्यांना संधी यावर अण्णासाहेब थोरात, वन शेतीतून समृद्धीकडे (एकरी 3 कोटी उत्पादन) दिनेश ठाकरे (कृषीरत्न, नागपूर) यांनी मार्गदर्शन केले.
शेतकर्यांना व उत्पादक कंपन्यांना 51 प्रकारचे नवीन कृषी व्यवसायांची देखील माहिती दिली. यावेळी महाराष्ट्रातील 11 उपक्रमशील कृषी उद्योजक/कृषी विस्तारक यांना नॅशनल आयकॉन बिझनेस अवॉर्ड स्वरुपात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वीरगाव (ता.अकोले) येथील विश्व हायटेक नर्सरी यांच्यावतीने आलेल्या सर्व शेतकरी कंपन्यांना रोपवाटिकेची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण कार्यशाळेत अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वच कृषी उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.