बीविरहित कलिंगडाच्या कलम प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा
वीरगाव/प्रतिनिधी
जगप्रसिद्ध नन्हेम्स या बियाणे कंपनीने अल्पावधीतच कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे. सातत्याने नवनवीन संशोधन करुन उत्कृष्ट आणि विश्वसनीय वाणांची निर्मिती करत आहे. या पार्श्वभूमीवर बीविरहित कलिंगडाचे कलम करण्याच्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाविषयी शुक्रवारी (ता.1) बैठक होवून सकारात्मक चर्चा करुन नियोजन करण्यात आले.
या बैठकीस विश्व हायटेक नर्सरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र थोरात, नन्हेम्स कंपनीचे विक्री व्यवस्थापक करमपालसिंग जोसन, विभागीय उत्पादन विकास प्रतिनिधी गोलम सिद्दीकी, विभागीय विक्री व्यवस्थापक जगदीश नागपुरे, विकास व्यवस्थापक एस.एम.माकर, विक्री व्यवस्थापक योगेश लहासे, विकास प्रतिनिधी योगेश ढगे आदी उपस्थित होते. उन्हाळ्यात कलिंगडाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यादृष्टीने शेतकरी दरवर्षी विविध जातींच्या कलिंगडाची लागवड करतात. मात्र, शाश्वत व संकरित वाण म्हणून विकसित केलेल्या बीविरहित कलिंगडाचे कलम करुन लागवड करण्याचा प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू करण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.