माहिम येथे नूतन कार्यालयाचे रविवारी उद्घाटन
वीरगाव/प्रतिनिधी
काळ्या आईचे सेवेचं व्रत घेतलेल्या विश्व हायटेक नर्सरीने गेल्या सोळा वर्षांत गुणवत्ता आणि विश्वासाच्या बळावर शेतकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दिवसेंदिवस वाढणारी मागणी, तत्पर सेवा आणि शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सल्ला व मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीकोनातून पालघर जिल्ह्यातील माहिम येथे नर्सरीच्या नूतन कार्यालयाचे 10 ऑक्टोबरला उद्घाटन होणार असल्याची माहिती नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी दिली आहे.
विश्व हायटेक नर्सरीने शेतीमध्ये क्रांती घडविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी कायमच पुढाकार घेतला आहे. मात्र, वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना विनम्र व तत्पर सेवा देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील माहिम पिंपळ बाजार येथील प्रणय स्मृती बंगल्यात नूतन कार्यालयाचे रविवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी सरपंच दीपक करबट, उपसरपंच नरुत्तम राऊत उपस्थित राहणार आहे. तरी कोरोनाचे नियम पाळून या कार्यक्रमास हितचिंतक व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नर्सरीचे सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे यांनी केले आहे.