काश्मीरच्या सफरचंदाची गोडी मिळणार पिंपळगाव निपाणीमध्ये!
प्रयोगशील शेतकरी संजय वाकचौरे करताहेत संपूर्ण शेती सेंद्रीय
वीरगाव/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा वाढत चाललेला रासायनिक शेतीकडील कल आणि दिवसेंदिवस घटत चाललेली उत्पादनाची गुणवत्ता, मानवाच्या तसेच पर्यावरणावर होणारे घातक परिणाम, निसर्गावर होणारे अनिष्ट परिणाम या सर्व गोष्टींचा नीट विचार केला तर सेंद्रीय शेती करणे महत्त्वाचे आहे. या धर्तीवरच पिंपळगाव निपाणी ता.अकोले येथील प्रयोगशील शेतकरी संजय देविदास वाकचौरे यांनी विषमुक्त शेतीचा चंग बांधला असून, आपली संपूर्ण शेती सेंद्रीय पद्धतीनेच करत आहे. नव्यानेच ते सफरचंदाची लागवड करत असून, त्यांचा हा प्रयोग देखील यशस्वी होईल. त्यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी देखील सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे आवाहनही ते यानिमित्ताने करत आहे.
विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी नुकतीच शेतकरी संजय वाकचौरे यांच्या शेतीला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी डाळिंब, ॲपल बोर, ऊस, कांदे आदी पिकांची पाहणी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषकरुन त्यांच्या यशस्वी शेतीचे रहस्य जाणून घेत सेंद्रीय शेती ही लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे. यामुळे वाफ्यात पाणी टिकून राहते. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यावर प्रभावी उपाय हा सेंद्रीय शेती हाच आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे आवाहन नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी केले.
शेतकरी संजय वाकचौरे यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीपिकांना जैविक खते व औषधे देतात. यामुळे रासायनिकच्या तुलनेत त्यांचे शुद्ध आणि भरघोस उत्पन्न निघत असल्याचे सांगतात. सध्या त्यांचे ॲपल बोर काढणी चालू आहे. यामध्ये प्रतिझाड सुमारे दोनशे किलो माल निघत आहे. तर काश्मीरच्या तोडीचे सफरचंद येथे पिकविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांनी आळेफाटा, कोपरगाव, निमज येथील सफरचंद लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भेट देऊन अभ्यास केला आहे. त्यानुसारच ते हा प्रयोग येथे राबवत आहे. त्यांच्या शेतीचे रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक कृषी अधिकारी, अभ्यासक व शेतकऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे. परंतु, ही शेती मर्यादित न राहता तिचे व्यापक स्वरुप व्हावे. यादृष्टीने अत्यंत माफक दरात ही खते-औषधे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कंपनीची स्थापना केली आहे. सध्या तिचे काम प्रगतीपथावर आहे.