राहुरी/प्रतिनिधी
जगप्रसिद्ध सिजेंटा बियाणे उत्पादक कंपनीने कायमच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. याचाच एक भाग म्हणून कलिंगड लागवडीतून शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टीकोनातून राहुरी येथील हॉटेल साईदर्शनमध्ये रविवारी (ता.19) सकाळी 10.30 वाजता कलिंगड पीक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिजेंटा कंपनी नेहमीच तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारत आलेली आहे. यामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. नवीन व फायदेशीर वाण विकसित करुन शेतकऱ्यांना उत्तम पर्याय उपलब्ध होत असल्याने कंपनीवरील शेतकऱ्यांचा विश्वास दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने कलिंगड पिकातून शेतकऱ्यांची समृद्धी व्हावी या उदात्त हेतूने चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी कंपनीचे व्यवसाय व्यवस्थापक रोहित पोरे यांनी कलिंगडाविषयी सविस्तर माहिती दिली. बदलते हवामान आणि नवीन तंत्रज्ञान यांची कलिंगड पिकातील भूमिका यावर मार्गदर्शन केले. तसेच उत्तर नगर जिल्ह्याचे वरीष्ठ क्षेत्रीय व्यवस्थापक शशीकांत कराळे यांनीही लागवड व लागवडपश्चातविषयी मार्गदर्शन केले. बियाणे व रोप लागवडीविषयी विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी विविध उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. या चर्चासत्रास समृद्धी ॲग्रो सर्व्हिसेसचे सुरेश भोसले, प्रगतिशील येवले नाना, दीपक धसाळ, नवनाथ तांबे आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सिजेंटा कंपनीने विकसित केलेल्या हॅप्पी फॅमिली (सीडलेस), सिम्बा आणि सुपरक्वीन या तीन वाणांचा शुभारंभ केला. शेवटी कलिंगडाच्या नवीन वाणांची लागवड करुन शेतकऱ्यांनी उन्नती साधावी, असे आवाहन चर्चासत्राच्या आयोजकांनी केले.