व्यंकटेश ॲग्रो मॉलच्या कांदा पीक प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेतकऱ्यांचा सन्मान, सुधाकर तोरकड यांचाही गौरव

व्यंकटेश ॲग्रो मॉलच्या कांदा पीक प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेतकऱ्यांचा सन्मान, सुधाकर तोरकड यांचाही गौरव

वीरगाव/प्रतिनिधी

अकोले शहरानजीक असणाऱ्या व्यंकटेश ॲग्रो मॉलने मंगळवारी (ता.19) विठ्ठल लॉन्स येथे सकाळी अकरा वाजता कांदा पीक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. या वर्गात जळगाव येथील पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उपसामान्य व्यवस्थापक अमोल पाटील यांनी कांदा पिकाबाबत शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन केले असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचबरोबर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेतकऱ्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये वीरगाव (ता.अकोले) येथील सुधाकर तोरकड यांनी कलिंगडसह इतर पिकांत भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने गौरव करण्यात आला.


या प्रशिक्षण वर्गाचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विश्‍व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रामनाथ डोंगरे आदी उपस्थित होते. पाटील बायोटेकचे उपसामान्य व्यवस्थापक अमोल पाटील यांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाची रोप निर्मिती ते साठवणूक करण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. यानंतर कृषीमध्ये उल्लेखनीय कार्य करुन स्थैर्य मिळविल्याबद्दल शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

यामध्ये वीरगाव येथील सुधाकर तोरकड यांनी कलिंगडसह इतर पिकांत भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल प्रयोगशील शेतकरी पुरस्कार, कळस येथील सुनील वाकचौरे यांनी झेंडू व फ्लॉवरमध्ये किमया साधल्याबद्दल आदर्श शेतकरी पुरस्कार, उंचखडक येथील रवींद्र देशमुख ऊस व टोमॅटोमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल कृषीरत्न पुरस्कार, उंचखडक येथीलच कपील चासकर यांनी असंख्य शेतकऱ्यांना शेतीविषयी तंत्रशुद्ध मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना कृषीमित्र पुरस्कार, वडगाव लांडगा येथील दत्तात्रय लांडगे यांनी डाळिंबातून विक्रमी उत्पन्न मिळविल्याबद्दल त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार तर पाटील बायोटेकचे अमोल पाटील हे सातत्याने कृषीमध्ये नवनवे संशोधन व प्रयोग करुन शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन करत असल्याने त्यांना शेतीतज्ज्ञ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रशांत धुमाळ यांनी केले तर आभार सुनील गिते यांनी मानले. या कार्यक्रमासाठी व्यंकटेश ॲग्रो मॉलचे संचालक सुनील गिते, प्रियंका गिते, अनिकेत गिते, सुनील डोंगरे, संतोष कडलग, अमोल वाकचौरे आदिंनी परिश्रम घेतले. वरील सर्व पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचे विश्‍व हायटेक नर्सरीने अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply