वीरगाव येथील मोफत प्रशिक्षण शिबिरास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रिझवान सीड्स इंडिया कंपनीचे वेणूगोपाल रेड्डी यांनी केले मार्गदर्शन
वीरगाव/प्रतिनिधी
येथील कृषीजननी कृषी जननी फार्मर प्रोड्युसर कंपनी, कृषी संजीवनी डाळिंब-भाजीपाला उत्पादक गट, महाराष्ट्र शासन कृषी विभाग अकोले व रिझवान सीड्स इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.27) आयोजित केलेल्या कीडरोग व्यवस्थापन व अन्नद्रव्य व्यवस्थापन मोफत प्रशिक्षण शिबिरास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रिझवान सीड्स कंपनीचे साऊथ एशिया हेड वेणूगोपाल रेड्डी यांनी अनमोल मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
वीरगाव येथील कृषी जननी फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये विश्व हायटेक नर्सरीच्या सहकार्यातून हे शिबिर पार पडले. यावेळी तालुका कृषी अधिकारी माधव हासे, रिझवान सीड्स कंपनीचे सुहास यादव, आत्माचे बाळनाथ सोनवणे, विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात आणि शेती सल्लागार नीलेश दिक्षीत उपस्थित होते.
विशेषत्वाने शेडनेट व पॉलिहाऊसमधील ढोबळी मिरची व काकडी पिकांविषयी मार्गदर्शन करताना रिझवान सीड्स कंपनीचे वेणूगोपाल रेड्डी यांनी पीक लागवड ते पीक काढणीपर्यंतच्या प्रवासाची सूक्ष्म निरीक्षणे कथन केली. तसेच वाण निवडताना विशेष निकष लक्षात घेण्याबद्दलची माहिती दिली. शेवटी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. याचबरोबर तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी जमिनीचा सेंद्रीय कर्ब, शेणखत व हिरवळीच्या खतांचे शेतीतील महत्त्व उदाहरणांद्वारे समजावून सांगितले.
या प्रशिक्षण शिबिराचे सूत्रसंचालन कृषी जननी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष गणेश तोरकड यांनी केले. तर आभार डॉ.जालिंदर खुळे व सदस्य अनिल देशमुख यांनी मानले. प्रस्तावना आत्माचे बाळनाथ सोनवणे यांनी केले. या शिबिरासाठी सुमारे शंभराच्यावर शेतकऱ्यांनी हजेरी लावून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. तर कृषी जननी कंपनीच्या सर्वच सदस्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.