सुखद वार्ता; आता शिर्डीतून विमानाने पाठविता येणार शेतमाल! दीड महिन्यात पस्तीस मेट्रिक टन भाजीपाला कार्गो सेवेद्वारे पाठविला

शिर्डी/प्रतिनिधी
शिर्डी येथील विमानतळावरील विविध अडचणी व असुविधांवर मात करीत स्पाईस जेट विमान कंपनीने कार्गो सेवा सुरू केली आहे. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी त्याद्वारे ब्रोकली, शेवग्याच्या शेंगा आणि लसणाची पात चेन्नईला पाठवत आहेत. गेल्या दीड महिन्यात तब्बल पस्तीस मेट्रिक टन भाजीपाला कार्गो सेवेद्वारे पाठविण्यात आला आहे. या सुविधेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व कळवण तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आठ-दहा जणांचा गट करून हा भाजीपाला चेन्नई येथे पाठविण्या सुरुवात केली. तेथील खरेदीदार व्यापारी हा माल पुढे मलेशियाला पाठवतात. पॅकिंग आणि प्रतवारीचे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात केलेले आहे. व्यापाऱ्यांच्या सहाकार्याने कार्गो सेवेचा लाभ घेत भाजीपाल्याला अधिक भाव मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दुसरीकडे या विमानतळावर माल वाहतुकीसाठी स्वतंत्र कार्गो टर्मिनस व शीतगृहाची सुविधा नाही. कार्गो सेवेबाबत अद्यापही शेतकऱ्यांत आणि व्यापाऱ्यांत या सेवेबाबत फारशी जागृती झालेली नाही. व्यापाराची साखळी तयार झालेली नाही, असे असताना स्पाइस जेटचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कार्गो सेवेद्वारे भाजीपाला पाठविण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. त्यासाठी तुलनेत वाहतूक दर कमी ठेवले. त्याचा परिणाम म्हणून दीड महिन्यात तब्बल पस्तीस मेट्रिक टन भाजीपाल्याची वाहातूक झाली. त्याची दखल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने घेत व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी अभिनंदन केले.

व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी केलेले कौतुक उत्साह वाढविणारे आहे. वाहतूक दर कमी असल्याने नाशिक, पुणे व औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राला लागणारे साहित्य या विमानतळावर पाठविले जाते. आज गुजरातच्या सीमेवरील सापुतारा भागातून शेतकऱ्यांनी आणलेली स्ट्रॉबेरी चेन्नईला पाठविण्यात आली.
– कृष्णा शिंदे (व्यवस्थापक, कार्गो विभाग)

शिर्डी विमानतळावर तातडीने शीतगृह उभारणे गरजेचे आहे. कार्गो टर्मिनल बिल्डिंग आवश्‍यक आहे. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील शेतमाल महानगरांत पाठविण्यासाठी हे विमानतळ सोयीचे आहे. प्रवासी विमानातून आम्ही कार्गो वाहतूक करतो. भविष्यात मागणी वाढली, तर स्वतंत्र कार्गो विमानसेवा सुरू करू.
– राजेश सिंग (व्यवस्थापक, कार्गो विभाग)

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply