विश्व हायटेक नर्सरीकडून शेतकऱ्यांसाठी पीक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
अकोले / प्रतिनिधी
यावर्षी रमजान महिना फेब्रुवारीत आला असल्याने हिवाळी हंगामात कलिंगड व खरबूज पिकाची लागवड सुरू झालीये. मात्र, हा हंगाम जिकिरीचा जरी असला तरी सूक्ष्म नियोजन केल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होईल, असे प्रतिपादन विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी केले.
देवठाण (ता.अकोले) येथील आदित्य लॉन्समध्ये विश्व हायटेक नर्सरीने नुकतेच हिवाळी हंगामातील कलिंगड व खरबूज पीक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस श्रीरामपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, अकोले तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, आदर्श शेतकरी रमेश गुंजाळ, तुकाराम गुंजाळ, दरबारसिंग राजपूत, संजय पाटील, ललित पाटील, वैजीनाथ फाळके, संतोष वायकर, संतोष शिंदे यांसह अहिल्यानगर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतून शेतकरी सहभागी झाले होते. तर व्यापारी प्रकाश भुजबळ, दीपक गवारे, आबा राजपूत, विशाल शेंद्रे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेत वीरेंद्र थोरात यांनी कलिंड व खरबूज पिकाचा लागवड ते काढणीपर्यंतचा संपूर्ण प्रवास कसा असावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यात अगदी वाण, रोपे, हवामान, पूर्वतयारी अशा मुद्द्यांचा समावेश होता. भारतबीट इन्फोकॉनचे संस्थापक विशाल पाटील यांनी खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयावर मार्गदर्शन केले. इन्सेक्टिसाईड्स इंडिया लिमिटेडचे डेव्हलपमेंट मॅनेजर प्रतीक मोरे यांनी कीड व रोग व्यवस्थापनाविषयी संवाद साधला तर फ्रुटवाला बागायतदारचे गणेश नाझिरकर यांनी आदर्श उत्पादन पद्धती आणि मल्चिंग पेपरविषयी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी पवार यांनी शासनाच्या एआय महाविस्तार ॲप वापराबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत सिजेंटा, नन्हेम्स, क्नोन यू, नामदेव उमाजी, ट्रुजेनिक, वेलकम, सागर, नांगाऊ या सीड्स कंपन्यांसह प्लॅन्टप्रो, इन्सेक्टिसाईड्स, पीसीबी या औषध कंपन्यांनी सहभागी होवून स्टॉलही लावले होते. या कार्यशाळेसाठी नर्सरीचे व्यवस्थापक लहुजी दातखिळे, अविनाश बोडखे, अविनाश भागवत, योगेश देशमुख, रवींद्र आंबरे, सुमित मेंगाळ, किशोर वाकचौरे, योगेश सावंत, दिलीप उघडे यांच्यासह सर्वच सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
