अकोले/प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून शेतीवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. परंतु, नैसर्गिक संकटांवर मात करीत रुंभोडीतील (ता.अकोले) शेतकऱ्याने झेंडूत कमाल केली आहे. अवघ्या दोन एकर क्षेत्रातून दोन महिन्यात 9 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. यातून निव्वळ नफा 7 लाख 25 लाख रुपये मिळाला असून, अद्यापही तोडा सुरूच असल्याने शेतकऱ्याच्या जीवनात सुगंध दरवळला आहे.
रुंभोडी येथील तरुण शेतकरी राहुल मालुंजकर यांनी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दोन एकर क्षेत्रावर येलो एक्सप्रेस या झेंडूच्या वाणाची 20 ऑक्टोबरला लावगड केली. त्यानंतर 1 डिसेंबरला पहिला तोडा निघाला. आजपर्यंत 8 तोडे झाले असून, अजूनही 5 ते 6 तोडे निघण्याची शक्यता आहे. हा हंगाम यशस्वी करण्यासाठी निसर्गावर यशस्वीपणे मात केली आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा अनुभवयास येत आहे. त्यामुळे शेतकरी मालुंजकर यांनी मल्चिंग पेपरचा वापर करुन लागवड केली. याचबरोबर वेळोवेळी जैविक बुरशीनाशकांची कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केली.
यामुळे आत्तापर्यंत 12 टन उत्पादन निघाले आहे. यास सरासरी प्रतिकिलो 90 रुपयांचा दर मिळाला असून, 9 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर संपूर्ण खर्च 2 लाख 35 हजार रुपये आला आहे, हा खर्च वजा जाता 7 लाख 25 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हतबल न होता निसर्गावर तंत्रज्ञानाचा कुशल वापर करुन मात केली तर नक्कीच यशस्वी होतो, असा विश्वास तरुण व प्रयोगशील शेतकरी राहुल मालुंजकर यांनी व्यक्त केला आहे.
दरवर्षी महालक्ष्मी देवीचे व्रत असलेल्या मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून झेंडूची लागवड करतो. यंदा क्षेत्र वाढवले असून, दोन एकरवर लागवड केली. आजपर्यंत 8 तोडे काढले असून, अजूनही 5 ते 6 तोडे निघतील. शेतकरी नेहमीप्रमाणे एक डोळा शेतावर तर दुसरा डोळा मार्केटवर ठेवतात. परंतु, मी ‘अर्धा डोळा शेतावर तर दीड डोळा मार्केटवर ठेवला आहे.’ यामुळेच हे यश मिळाले.
– राहुल मालुंजकर (झेंडू उत्पादक)